शिर्डी Kersuni Special Story : दिवाळीला प्रत्येक मराठी माणसाच्या घरात केरसुणी लक्ष्मी म्हणून पुजण्याची महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आज देखील घराघरात पाळली जाते. दिवाळीच्या दिवशी लोकांच्या घरामध्ये पुजली जाणारी लक्ष्मीची (केरसुणी) निर्मितीसाठी शेकडो हात आपलीही दिवाळी सुखकर होवो यासाठी राबतायेत.
विक्रीतून गरज भागवेल इतकासुध्दा आर्थिक लाभ नाही : महाराष्ट्रातील मातंग समाज प्रामुख्याने दिवाळी आधी मध्यप्रदेश राज्यातून अथवा इतर ठिकाणाहून लागणारा कच्चामाल अर्थात शिंदीच्या झाडाच्या झावळ्यापासून लक्ष्मी म्हणजेच केरसुणी बांधण्याचं काम वर्षानुवर्षे करतोय. दिवाळी सण आला की केरसुणी बनवण्याचा व्यवसाय चालतो. या कालावधीमध्ये दिवसाला 70 ते 80 केरसुण्या बांधल्या जातात. तसं पाहता एकूणच 10 ते 15 दिवसांदरम्यान सुमारे एक हजार ते दीड हजार केरसुण्या बांधून होतात. यातून मिळणारा मोबदला मात्र कमीच असतो. केरसुणीला सध्या 40 ते 50 रुपयांचा भाव मिळतोय. दुसरीकडं आधुनिक झाडूची किंमत 100 रुपयांच्या घरात आहे. केरसुणीच्या या किंमतीला देखील ग्राहकाकडून मोलभाव केला जातो. त्या विक्रीतुन गरज भागवेल इतकासुध्दा आर्थिक लाभ होत नाही. याच पैशातून मुलाबाळांना नवीन कपडे, घरातलं आजारपण, लोकांची देणी असा प्रपंच हाकला जात असल्याचं यावेळी केरसुणी बनवणारे पंडीत भिमराज शेलार यांनी सांगितलं.
दरम्यान, केरसुणी बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल पर राज्यातून आणावा लागतो हे कष्टाचं काम आहे. पण दोन पैसे मिळवण्यासाठी आमचं घरानं हे काम करत आलंय. लक्ष्मी पूजनाला केरसुणीला लक्ष्मीचा मान आहे. मात्र, आजही चार पैशे मिळविण्यासाठी शिंदीच्या काटेदार पानावर सफाईनं काम करत राबतायेत. केरसुणीची बांधणी करताना पूर्वी सुतळी, वाक (सुती दोर) वापरत असतं. आता नायलॉनच्या दोऱ्यांनी त्यांची बांधणी होते. दहा पंधरा, वीस इंच उंचीच्या लहान, मध्यम, मोठ्या केरसुण्या बाजारात उत्पादन करुन आणल्या जातात. केरसुणीनं झाडतांना वाकावं लागतं म्हणून आधूनिक झाडूला महत्व आलंय, असंही पंडीत भिमराज शेलार म्हणाले.
हेही वाचा -