अहमदनगर - कारगिल विजय दिनानिमित्त जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. "भारत माता की जय!", "जय हिंद..!", "शहीद जवान अमर रहे!" अशा घोषणा देत, अबालवृद्धांनी कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली.
अहमदनगर शहरातील पाऊलबुद्धे विद्यालयातून निघालेली रॅली, सावेडी उपनगरातील रत्यावरून फिरत श्रीराम चौकात आली. या दरम्यान हातात तिरंगा घेत रॅलीतील युवकांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. श्रीराम चौक येथे कारगिलच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी आमदार शिवाजी कर्डीले, महापौर बाबासाहेब वाकळे, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पालवे आणि सामाजिक कार्यकर्त्या आशा साठे आदी उपस्थित होते.
पाकिस्तानने कारगिलमध्ये केलेली घुसखोरी भारतीय जवानांनी प्राणाची शर्थ करत शौर्याने हुसकावून लावली होती. या युद्धात पाचशेहून अधिक भारतीय जवानांनी देशासाठी आपले प्राणार्पण केले. या सर्वांच्या स्मृतींना उजाळा देत कारगिल विजयी दिन देशभरात साजरा केला जातो.