राहुरी - नगर-जामखेड रोड येथे राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत जामखेड नाका ते आठवड या 19 किलोमीटर रस्त्याचे पॅचिंगचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत काम बंद पाडून जन आधार सामाजिक संघटनेच्यावतीने रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मागील महिन्यात जामखेड नाका ते आठवड या रस्त्यावर 19 किलोमीटरपर्यंत रस्ता पॅचिंगच्या कामाचे उद्घाटन झाले. खड्डे बुजवण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून, खड्डे फक्त खडी टाकून बुजवले जात आहे. त्या खड्ड्यांमध्ये डांबर सुद्धा वापरले जात नसल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. खड्डे बुजविण्याचे काम योग्य पध्दतीने न झाल्यास रस्त्यावर टाकण्यात येणारी लेयरदेखील जास्त काळ टिकणार नाही. रस्त्यासाठी सुमारे 15 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. एवढा खर्च करुन देखील रस्ता चांगला न झाल्यास पुढील वर्षी हीच समस्या उद्भवणार आहे. अशा निकृष्ट कामामुळे जनतेच्या पैशांची एकप्रकारे उधळपट्टी सुरू असल्याचे पोटे यांनी म्हटले. आंदोलनाची दखल न घेतल्यास नॅशनल हायवेच्या अभियंत्यास खुर्चीला बांधून ठेऊ, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.