अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्या येथे राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. त्यासाठी नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगडचे महंत व पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त भास्करगिरी महाराज यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. ते तीन तारखेला अयोध्येस रवाना होणार आहेत.
अयोध्येत भव्य दिव्य असं राम मंदिर उभारलं जाणार असून ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान १५० निमंत्रितांसह एकूण २०० जणं उपस्थित राहणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टने दिली आहे.
नेवासा तालुक्यातील भास्करगिरी महाराज रामजन्मभूमी आंदोलनावेळी महाराष्ट्र कार सेवासमितीचे प्रमुख होते. आज राम जन्मभूमी अयोध्या येथे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिराच्या उभारणी कार्याचा भूमिपूजन शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमासाठी राम जन्मभूमी न्यासाच्या ट्रस्टच्या वतीने भास्करगिरी महाराजांना निमंत्रित केल्यामुळे तालुक्यासह राम भक्तांमधून आनंद व्यक्त होत आहे.