अहमदनगर - जिल्ह्यातील मेहंदुरी येथील विकास आरोटे या शेतकऱ्याने थेट 'इंडोनेशियाच्या व्हाया आसाम काळ्या भाता'ची लागवड आपल्या शेतात केली आहे. आता या भाताची लागवड इतर शेतकरीही करत असून सध्या या भाताला ओंब्या लगडल्या आहेत.
हेही वाचा - वडिलांच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी रेणुका करतेय संघर्ष
या वर्षी अकोले तालुक्यातील धामणवन आणि शिरपुंजे या परिसरातील 20 शेतकऱ्यांनीही या निळ्या भाताची आपल्या शेतात लागवड केली आहे. या भाताची जोमदार वाढ झाली आहे. काळ्या भात लागवडीचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे. या भातात औषधी गुणधर्म आहेत. तसेच, यात फायबर, लोह, ताम्र, अॅन्टीऑक्सिडंटचे प्रमाण अधिक आहे. भारतात हा 'आसामी काळा भात' म्हणून प्रसिद्ध आहे. पंचतारांकित हॉटेलात याला मोठी मागणी असते. याची उंची जास्त आणि दणकट बुंधा असल्याने कितीही वारे आले तरी तो खाली पडत नाही. याची एकरी वीस ते पंचवीस पोते साळ निघते.
हा भात शिजवल्यावर जांभळा दिसतो. तो इंडोनेशिया आणि आसामच्या व्यापार संबंधांतून भारतात आला आहे. सध्या बाजारात या भाताची तीनशे ते पाचशे रुपये किलो दराने विक्री होते. आसाम, मणिपूर, पंजाबमध्ये निर्यातक्षम तांदळात याची गणना होते.