अहमदनगर - वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात अडकलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्याच्या मागणीसाठी जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भक्ती शक्ती महोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात सामील झाले. टाळ-मृदुंगाच्या निनादात समिती कार्यकर्ते आणि बाल वारकऱ्यांनी तहसील कार्यालया बाहेर हरिनामाचा गजर करत ठेका धरला. यावेळी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना दिलेल्या निवेदन देण्यात आले.
हेही वाचा - इंदोरीकर महाराजांनी माफी मागितली विषय संपला, प्रसिद्धीसाठी काही महिला करताहेत आंदोलनाची भाषा
या निवेदनात म्हटले आहे की, समाज प्रबोधनकार निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करु नये. ते महाराष्ट्रातील एक थोर व्यक्तीमत्व आहेत. धार्मिक ग्रंथ आणि गुरूचरित्राच्या आधारेच इंदोरीकर महाराज बोलत आहेत. इंदोरीकर महाराज आपल्या किर्तनात जे दाखले देतात ते ग्रंथांच्या आधारेच देतात. तृप्ती देसाई यांनी महाराजांना त्रास देण्याचे काम करु नये, असे आवाहन यावेळी समिती सदस्यांनी केले.