अहमदनगर - दरवर्षी जानेवारी महिना सुरू झाला की, गावोगाव यात्रांची लगबग असते. संगमनेर तालुक्यातील देवगडमध्येही माघ पोर्णिमेला खंडोबाची यात्रा भरते. यंदा यात्रेनिमित्त अश्वांची नृत्य स्पर्धा आणि प्रदर्शन भरवण्यात आले होते. या नृत्यस्पर्धेत शेकडो अश्वांनी कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
संगमनेरमधील अश्वप्रेमी असोसिएशनच्या वतीने हे भव्य अश्व प्रदर्शन भरवण्यात आले. विविध जातींच्या अश्वांचे प्रदर्शन आणि नृत्य स्पर्धेमुळे या यात्रेचा लौकिक राज्यभर पसरत आहे. यंदा अश्व प्रदर्शनाचे सहावे वर्ष आहे. देशभरातील शेकडो अश्वांनी यामध्ये सहभाग नोंदवला. यावर्षीच्या प्रदर्शनात विविध जातीच्या 667 अश्वांनी सहभाग घेतला. तसेच यंदा विविध प्राणी-पक्ष्यांचेही प्रदर्शन भरवण्यात आले.
हेही वाचा - सूर्यमुखींनी लवकर उठावे.. अजित पवारांच्या जितेंद्र आव्हाडांना कानपिचक्या
नृत्य स्पर्धेत अश्वांनी सादर केलेले साहसी नृत्य, थाळा नृत्य, बुलेटवरील नृत्य आणि बाजेवरील नृत्य अशा थरारक नृत्य प्रकारांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या अश्वांना शिकवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या अश्वमालकांनाही प्रेक्षकांनी दाद दिली. अकलूज, सारंखेडा, शिरपूर यानंतर आता देवगड येथे भरणारे अश्व प्रदर्शन राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवत आहे.