अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील पठार भागात दिवसेंदिवस दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होत आहे. डोळासणे शिवारातील कान्हेवाडीसाठी आठवड्यातून एकदाच टँकर येतो. त्यामुळे तो अपुरा पडत असल्याने टँकरमधील पाणी विहिरीत साठवण्यात येते. कठडे नसलेल्या या विहिरीतील पाणी भरण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पठार भागात पाणीटंचाईची भीषणता वाढू लागली आहे. दिवसेंदिवस भूजलपातळी खाली जात आहे. पाण्याचे शून्य नियोजन, वारेमाप पाणी उपसा, पाणी अडवा पाणी जिरवा या योजना प्रभावीपणे राबविण्यात आलेले अपयश, जलयुक्त शिवाराचा कागदी डांगोरा यामुळे वर्षानुवर्षे पठारभागाला पाणीटँकरचे लागलेले ग्रहण सुटता सुटेना. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थ जीव मुठीत धरून कसरत करताना दिसत आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या डोळासणे परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गाव, वाडी आणि तांड्यामध्ये दुष्काळामुळे अनेकांनी स्थलांतर केले. कान्हेवाडीची लोकसंख्या ३०० असून वाडीतील नागरिकांची पाण्यासाठी कठडे नसलेल्या खोल विहिरीत पाणी भरण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या विहीरीत गेल्या वर्षी दोघांचा मृत्यू झाला होता. यंदा दोन महिला पाणी काढताना विहिरीत पडून गंभीर जखमी झाल्या आहेत. मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आली नसल्याची संतप्त भावना वाडीतील महिलांनी व्यक्त केली आहे.