अहमदनगर- जिल्ह्यातील सोनई गावात 2013 साली घडलेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने राज्यात खळबळ माजवली होती. या संदर्भात नाशिक सत्र न्यायालयाने या प्रकरणातील 4 आरोपींना दिलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. सबळ पुराव्याअभावी अशोक नवगिरे याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
या प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हत्या प्रकरणात सतत पाठपुरावा करणाऱ्या आणि पीडित कुटुंबाच्या पाठीशी राहणाऱ्या मेहतर-वाल्मिकी समाजातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत बोलताना समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आणि कांग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दीप चव्हाण यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना मृत कुटुंबियांना न्याय मिळाल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी हत्या झालेल्या तरुणांचे कुटुंब जिल्ह्यातून घाबरून परागंदा झाले. मात्र, मेहतर-वाल्मिकी समाजाने राज्यभर आंदोलने करत हे प्रकरण लावून धरले होते.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. 'आरोपींचे कृत्य हे राक्षसांप्रमाणे क्रूर आहे. थंड डोक्याने त्यांनी पीडितांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून करण्यात आला. हे कृत्य खूपच निर्घृण आहे, असा युक्तिवाद निकम यांनी केला होता.
तिहेरी हत्याकांडातील दोषी सात आरोपींपैकी सहा आरोपींना १८ जानेवारी २०१८ रोजी नाशिक सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच, परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले ते पाहता तुम्ही सैतानही आहात. तुम्ही जिवंत राहणे हे समाजासाठी धोकादायक आहे’ अशा शब्दात न्यायालयाने निकालपत्रात म्हटले होते. प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर आज त्यावर न्यायालयाने निर्णय देत चार आरोपींची फाशी कायम ठेवली आहे.
काय आहे प्रकरण-
सोनई येथे 2013 साली सचिन घारू, संदिप राज थनवर व राहुल कंडारे या युवकांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. सवर्ण समाजातील मुलीसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून सचिन, संदिप आणि राहुल या तिघांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा महाराष्ट्रासह देशभरात निषेध करण्यात आला होता. दरम्यान, तिहेरी हत्याकांडातील दोषी रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले, गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले, संदिप कुरे अशी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
अशी करण्यात आली होती हत्या-
संदीप राज धनवार, राहुल कंडारे, सचिन घारू हे तिघे तरुण नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे, असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार करण्यात आले होते. त्यानंतर पळून जाणाऱ्या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. धनवार व कंडारे यांचा खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरड्या विहिरीत पुरण्यात आले, तर घारू याचे मुंडके व अडकित्त्याने तोडलेले हातपाय एका कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते.