अहमदनगर - अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शनिवारी अतिदक्षता विभागात आग लागली होती. या आगीत ११ रुग्णांचा होरपळून आणि गदमरुन मृत्यू झाला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहाणी केली. कोरोना काळात अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. अशा घटना घडू नये यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
सुरक्षा यंत्रणा उभारणी साठी 217 कोटींची मागणी
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, 'अशा घटनातून बोध घेत प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र फायर सेफ्टी ऑफिसरची नेमणूक केली जाणार आहे.' जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, पालिका, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या व अशा सर्व रुग्णालयांमधील फायर ऑडिड केले जाईल. अशा दुर्घटना होऊ नये यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याच बरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये तांत्रिक आणि प्रशासकीय कामांसाठी सुरक्षा यंत्रणा उभारणी साठी 217 कोटी रुपयांची रक्कम तातडीने मिळावी अशी मागणी केल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले. आठ दिवसांमध्ये या घटनेचा अहवाल मागवून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
राज्यांमधील शासकीय इमारती या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पूर्ण होत असतात असे सांगताना टोपे म्हणाले, 'अहमदनगरच्या रुग्णालय दुर्घटनेत कुठे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचा दोष दिसत आहे. इमारत उभारणीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दोष ठेवल्यामुळे ही दुर्घटना झाली असल्याची शक्यता आहे का, असा सवाल टोपेंनी उपस्थित केला.
राजेश टोपे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, 'बांधकाम, तांत्रिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक आणि यासाठी विविध लागणारा निधी यावर लक्ष द्यावे लागणार आहे.' या प्रकारच्या दुर्दैवी घटना यापुढे होऊ नये, यासाठी राज्य सरकार लक्ष देईल. त्यावर उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - अहमदनगर रुग्णालय आग प्रकरण; राज्य सरकारबरोबरच केंद्राची कमिटी चौकशी करणार