अहमदनगर - अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकाचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जिल्हा बँक, विधानपरिषद आदींच्या निवडणुका असल्याने दोन्ही ठिकाणी लक्ष देणे अवघड आहे. तसेच गृहजिल्हा कोल्हापूर असल्याने तिकडे लक्ष देणे गरजेचे असल्याने अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मुक्त करावे अशी विनंती पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती ग्रामविकास तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
- कोविड मृत्यू, अतिवृष्टीबद्दल मदत लवकरच-
अहमदनगरमध्ये कोविड, अतिवृष्टी याविषयावर आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मात्र, जोपर्यंत पक्ष सांगत नाही तोपर्यंत आपण पालकमंत्री या नात्याने नगर जिल्ह्यात लक्ष ठेवून असू, हा निर्णय पूर्ण पक्षाध्यक्षांवर अवलंबून आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. जिल्ह्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्या वारसांसाठी केंद्र सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून मिशन वाच्छल्य आणि वीर ताराराणी योजनेअंतर्गत वारसांना विशेषतः विधवा महिला भगिनींना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली. अतिवृष्टीमुळे शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेले शेती, विहिरीचे नुकसान, मानवी मृत्यू, जनावरे-पक्षी मृत्यू, घरांची पडझड आदीबाबत निधी उपलब्ध केला जात असून दिवाळीपूर्वी ही मदत संबंधितांपर्यंत पोहचून दिवाळी गोड करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
- किरीट सोमैयांच्या आरोपांना उत्तर-
किरीट सोमैयांनी केलेल्या आरोपावर बोलताना, पैसे दिलेच नाहीत तर घोटाळा कुठून होणार असा प्रतिप्रश्न मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित केला. करू द्या चौकशा, दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाईन असे सांगत सोमैयांच्या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
- बांधकाम मजुरांसाठी माधान्य भोजन-
बांधकाम मजुरांसाठी माधान्य भोजनाचा शुभारंभ मुश्रीफ यांनी कामगार मंत्री या नात्याने केला. विविध क्षेत्रात पाच कोटी कामगार आजमितीला राज्यात असून त्या पैकी केवळ ८० लाख कामगारांची नोंदणी आहे. त्यामुळे इतर राहिलेल्या कामगारांसाठी विविध शासकीय मंडळे स्थापन करून संबंधित क्षेत्रावर सेसच्या माध्यमातून निधीच्या माध्यमातून या कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. माधान्य भोजनाच्या शुभारंभानंतर मुश्रीफ यांनी स्वतः वाढपी होत कामगारांना भोजन ताटात वाढले.
हेही वाचा - किरीट सोमैयांचा हसन मुश्रीफांवर आणखी एक आरोप.. ग्रामपंचायत कंत्राटात 1500 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार