अहमदनगर - घोंगडी बैठकीच्या निमित्ताने कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना त्यांना पोस्टर बॉय म्हटले आहे. रोहित पवार हे स्वत:ला मुख्यमंत्री समजतात अशी टीका पडळकर यांनी पवारांवर केली. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी देखील पडळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पडळकर नेहमीच पवार कुटुंबावर टीका करत असल्यानेच भाजपाने त्यांना आमदारकी दिल्याचे त्यांनी म्हटले.
रोहित पवारांच्या मतदारसंघात पडळकरांची फटकेबाजी
श्रीगोंदा, कर्जत तालुक्याच्या हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आल्याचे सांगत, रोहित पवार हे कामामध्ये कधीकधी आणि श्रेयामध्ये सर्वात आधी असल्याचं आ. पडळकर यांनी म्हटलं आहे. तसेच आपणच मुख्यमंत्री असल्यासारखं रोहित पवार वागतात, पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करतात अशी टीकाही पडळकर यांनी केली. आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याकडे मात्र त्यांचे लक्ष नाही, बारामती ॲग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या खाद्याने मोठे नुकसान झाल्याची तक्रार एका तरुणाने आपल्याकडे केली असल्याचेही यावेळी पडळकर यांनी म्हटले आहे. रोहित पवार हे शरद पवारांचे सुधारीत व्हर्जन असून, शरद पवार यांनी पाच पिढ्याची माती केली आहे, आता पुढील पाच पिढ्यांची माती रोहित पवारांमुळे होईल असा निशाणा त्यांनी यावेळी रोहित पवारांवर साधला.
महाविकास आघाडीमध्ये सावळा गोंधळ - पडळकर
महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळा सावळा गोंधळ असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. एका खात्याचा निर्णय दुसराच मंत्री जाहीर करतो. मंत्र्याने एखादा निर्णय घेतला तर तो मित्र पक्षातील दुसऱ्या मंत्र्याला मान्य नसतो. राज्य सरकारचा असा कारभार राज्यातील जनतेने आजपर्यंत कधी अनुभवला नव्हता अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
पवार कुटुंबावर टीका करतात म्हणून पडळकर यांना आमदारकी - पवार
पडळकरांच्या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पवारांवर सातत्याने टीका केल्यामुळे त्यांना आमदारकी देण्यात आली, त्यांच्याकडून दुसर काही बोलण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. पडळकर यांनी टीका करण्यापेक्षा स्वतः काय विकास केला यावर चिंतन करावे असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. मी कधीही स्वतःला मुख्यमंत्री मानत नाही, मग याचा साक्षात्कार पडळकर यांना कुठे झाला त्याचा खुलासा त्यांनी करावा असेही यावेळी रोहित पवार यांनी म्हटले आहे.
मंडल आयोगाला विरोध करणाऱ्या भाजपात पडळकर कसे?
आमदार रोहित पवार म्हणाले की पडळकर हे बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणार आहेत असे बोलले जाते, मग ज्या भाजपाने मंडल आयोगाला विरोध केला त्या पक्षामध्ये ते कसे काय आहेत. त्यांनी आधी आपली भूमिका जाहीर करावी. सांगलीमधील त्यांचे एक भाषण खूप गाजले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, काहीही झाले तरी मी भाजपमध्ये जाणार नाही, मग ते भाजपमध्ये का गेले असा सवालही रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच पडळकर यांनी नुसतीच टीका करण्यापेक्षा विकास कामांवर देखील बोलावे असं आवाहन देखील यावेळी रोहित पवार यांनी केले आहे.
हेही वाचा - काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढवणार, आघाडी कायमस्वरुपी नाही - पटोले