अहमदनगर - शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणेश मंदिरात गणेशोत्सवानिमित्त बसवलेल्या गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक गुरुवारी परंपरेनुसार काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता पूजा पार पडल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला.
हेही वाचा - औरंगाबादेत संस्थान गणेशाच्या पुजनाने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, चंद्रकांत खैरेंनी धरला ठेका
फुलांनी सजवलेल्या रथामध्ये मूर्तीला विराजमान करण्यात आले होते. परंपरेनुसार श्री विशाल गणेश हा मिरवणुकीत अग्रभागी असतो, त्या मागे शहरातील मानाचे इतर दहा गणपती असतात व त्यानंतर इतर गणेश मंडळांचे गणपती असतात. श्री विशाल गणेशाचा रथ भाविक आपल्या हातांनी ओढत मार्गस्थ करत असतात. तसेच पूर्णपणे पारंपरिक वाद्यांच्या निनादात ही मिरवणूक निघते. वाटेमध्ये ठिकठिकाणी गणेशाचे सडा रांगोळीने तसेच फुलांची उधळण करत स्वागत करण्यात येते. तसेच मूर्तीची आरती करून मोदक प्रसाद वाटला जातो. लाडक्या गणेशाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. श्री विशाल गणेश देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी याविषयी माहिती दिली.
हेही वाचा - गणेश विसर्जन : पवई तलावात घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात
हेही वाचा - पुण्याच्या पाचही मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात