अहमदनगर - घरात गणेशाचं आगमन झालं की त्याच्यासमोर आरास करण्याची प्रथा आहे. घरातील गणेशासमोर कोणी फुलांचा, कोणी मातीच्या डोंगराचा तर कोणी मखाराचा देखावा तयार करतात. मात्र शिर्डीतील मयुर चोळके या तरुणानं कोविड काळातील योगदान देणारे योद्धे, स्वच्छता आणि हरित क्रांतीचा वसा घेणाऱ्यांचा देखावा तयार केला आहे.
शिर्डी शहरात स्वच्छता आणि ग्रीन शिर्डी करणारे तब्बल पन्नास व्यक्तींचे मुखवटे लावून बालवयातील आठवणींना उजाळा देण्याचं काम केले आहे. शिर्डी शहरात कचरा करणारे, वृक्षतोड करणारी अनेक असतात. मात्र स्वच्छता आणि वृक्ष लागवडीचा निस्वार्थपणे वसा घेणारे अगदी बोटावर मोजण्याइतकीच मंडळी असते. अशा व्यक्तींचा गौरव व्हावा या उद्देशाने मयुर चोळके या युवकाने आपल्या घरातील गणपती समोर हा देखावा सादर केला आहे.
![मयूरने सुंदर देखावा साकारलेला आहे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-shirdi-ganeshuniquedecoration-16-rtu-mh10010_16092021095944_1609f_1631766584_1093.jpg)
शिर्डीतील पिंपळवाडी रोडलगत आपल्या राहत्या घरात मयूरने हा देखावा सादर केला आहे. या देखाव्याला शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, माजी विश्वस्त सचीन तांबे यांच्यासह अनेक व्यक्तींनी भेट दिली आहे. मयुरने आपल्या घरातील गणपतीसमोर सादर केलेला हा देखावा बघण्यासाठी शिर्डी परिसरातून अनेंक नागरिक येत असून अशा पद्धतीने कल्पक बुद्धी वापरत साकारलेल्या देखाव्या बद्दल मयूरचे कौतूक देखील केल्या जात आहे.
![मयूरने सुंदर देखावा साकारलेला आहे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-shirdi-ganeshuniquedecoration-16-rtu-mh10010_16092021095944_1609f_1631766584_242.jpg)