अहमदनगर- जिल्ह्यातील मुकुंदनगर (नगर शहर), आलमगीर (नगर तालुका), नाईकवाडापुरा (संगमनेर) आणि जामखेड शहर या चार ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. त्यामुळे या भागात संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे चार ठिकाणे कोरोना हॉटस्पॉट पॉकेट म्हणून घोषित केले आहेत.
त्यामुळे या चार ठिकाणांना शुक्रवार दिनांक १० एप्रिल सकाळी सहा वाजल्यापासून ते १४ एप्रिलला रात्री बारावाजेपर्यंत प्रतिबंधित करण्यात आले असून येथील नागरिकांना सर्व अत्यावश्यक सुविधा प्रशासन घरापर्यंत पोहचवणार आहेत. त्यामुळे या नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई असेल. या पॉकेट मधील सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत. या चारही ठिकाणा पासून दोन किलोमीटर व्यासातील क्षेत्र हे कोरोना क्षेत्र असेल. या क्षेत्रावर प्रशासनाचे विशेष लक्ष असून आरोग्य,पोलीस, संबंधित स्वायत्तसंस्था यांच्या देखरेखी खाली नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या प्रतिबंधित कालावधीत कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.