अहमदनगर - कोरोना विषाणूने देशात धुमाकूळ घातला असताना संगमनेरात 15 जण संशयित म्हणून ताब्यात घेतले आहेत. यापैकी चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संगमनेरात भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने आजपासून तीन दिवस संगमनेरात कडकडीत बंद पाळण्याचे आदेश दिले आहेत. ज्या परिसरातून 15 जणांना ताब्यात घेण्यात आले होते तेथील संपर्कात आलेल्या नागरिकांची कालपासून तपासणी सुरू करण्यात आली आहे.
जामखेडमध्ये आढळून आलेल्या दोन परदेशी नागरिकांच्या संपर्कात आल्याच्या कारणावरुन संगमनेरातील 15 जणांना प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. या सर्वांची जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या नमुन्यांचा अहवाल काल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. यामध्ये संगमनेरच्या 15 पैकी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
संगमनेरच्या सापडलेल्या बाधित व्यक्तींच्या संपर्कात आणखी कोण लोक आले आहेत, याचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील नायकवाडपुरा, बागवानपुरा, रहेमतनगर, मोगलपुरा हा परिसर प्रशासनाने यापूर्वीच सील केला आहे. काल आलेल्या 15 जणांच्या अहवालात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा प्रशासनाने सतर्क होत संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी सुरू केली आहे.
संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदीवरील मोठ्या पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. नायकवाडपुरा, बागवानपुरा, रहेमतनगर, मोगलपुरा या परिसरात कुणी जाणार नाही, तेथील एकही व्यक्ती बाहेर येणार नाही, असा प्रतिबंध प्रशासनाकडून करण्यात आला आहे. नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता अनेक पटीने वाढलेली आहे. त्यात नेपाळहून आलेले 14 लोक शहरात वास्तव्यास होते त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे, अशी प्रतिक्रिया डीवायएसपी रोशन पंडित यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.