शिर्डी (अहमदनगर) - ज्येष्ठ पत्रकार तसेच साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे माजी विश्वस्त अशोक भिमाशंकर खांबेकर (वय-65) यांचे आज (25 डिसेंबर) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नाशिक येथे कोरोनाचे उपचार सुरू असताना निधन झाले. सर्वांशी हसून आणि आदरानं बोलणारं एक प्रभावी व्यक्तिमत्व कोरोना संसर्गाला बळी पडले आहे. त्यांच्या पश्च्यात पत्नी मीनल खांबेकर, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अशोक खांबेकर हे अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक होते. वडीलोपार्जित काँग्रेस एकनिष्ठा अशोक यांना वारसात मिळालेली आणि त्यांनी ती अखेरपर्यंत समर्थपणे टिकवली. त्यांनी नगर जिल्ह्यातील पत्रकारितेत मोठे योगदान दिले. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था पीटीआयमध्ये प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केले होते. त्यांनी आपल्या पत्नीला खंबीर साथ देत दोनदा कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष बनवण्यात मोलाची भूमिका निभावली होती. त्यांचा जनसंपर्क देशविदेशात दांडगा होता.
अनेकांची नावे व मोबाईल क्रमांक, नातेगोते, अधिकारी, त्यांचे पद यांचे ते चालते-बोलते संगणक होते. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना आधीच दीर्घ आजार असल्याने कोरोना उपचारासाठी त्यांच्यात प्रतिकारशक्तीने साथ न दिल्याने आज नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.