अहमदनगर - मुळा एज्युकेशनमध्ये क्लार्क म्हणून नोकरीस असलेल्या प्रतीक बाळासाहेब काळे याने 29 ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सात जनांवर गुन्हा दाखल असून यातील चार आरोपींना एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यानंतर आता मंत्री गडाखांची चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी गडाख यांचा राजीनामा घ्यावा -
प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी पोलीस दबावात असून, आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिकने व्हॉट्सअॅप मेसेज, ऑडिओ-व्हिडिओ क्लिपमध्ये जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, त्यांच्या पत्नी, तसेच भाऊ विजय गडाख यांचीही नावे घेतली आहेत. त्यामुळे याप्रकरणी शंकरराव गडाख यांची पोलिसांनी चौकशी करावी, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री शंकरराव गडाख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात बाळासाहेब मुरकुटे सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते.
गडाख कुटुंबीयांवर आरोप -
मागील वर्षी गडाख कुटुंबातील एका महिलेने आत्महत्या केली होती. त्याचे पुढे काय झाले यावर पोलीस प्रशासनाने प्रकाश टाकावा आणि प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी मंत्री असले म्हणून शंकरराव गडाख यांच्या दबावात न येता कारवाई करून चौकशी करावी, अशी मागणीही मुरकुटे यांनी केली. यावेळी मोठा जनसमुदाय रास्तारोको आंदोलनात सहभागी झाला होता. रास्तारोको मुळे एसपी चौकातील चारही प्रमुख दिशांना जाणारी आंतरजिल्हा वाहतूक खोळंबली होती.
हेही वाचा - साई दर्शनाच्या पासचा काळाबाजार; साई संस्थानकडून कारवाई सुरू
'वंचित'कडून गडाखांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी -
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांना जलसंधारणमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख यांच्याकडून त्रास होत असल्याचा निषेध करून सुखदान यांच्या जीवितास गडाखांकडून धोका आहे, या आशयाचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले. मंत्री गडाख यांच्या वर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, उत्तर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा महासचिव योगेश साठे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चार आरोपींना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी -
याप्रकरणी आत्महत्येचे प्रवृत्त केल्याचा सात जनांविरोधात आरोप असून आरोपींपैकी चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये महेश कदम, विनायक दामोदर देशमुख, राहुल राजळे, व्यंकटेश बेल्हेकर यांचा समावेश आहे. आरोपी विनायक दामोदर देशमुख याला रविवारी सायंकाळी तर व्यंकटेश बेल्हेकरसह इतर तीन जणांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. या चौघांना सोमवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे. एमआयडीसी पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.