अहमदनगर - राहुरी तालुक्यातील कपारवाडी शिवारातील दोन दूध संकलन केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला आहे. या छाप्यामध्ये भेसळयुक्त दूध आणि भेसळीसाठी वापरण्यात येणारे रसायन असा एकूण 36 हजार 631 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या दूध संकलन केंद्राचे परवाने देखील निलंबित करण्यात आले आहेत.
राहुरी तालुक्यातील शिलेगावमधील दोन दूध संकलन केंद्रांवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुटे, शरद पवार, नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांच्या पथकाने छापा टाकला. दिलीप रघुनाथ म्हसे यांच्या गोरक्षनाथ दूध संकलन केंद्र तसेच रमेश पाटीलबा म्हसे यांच्या म्हसे पाटील दूध संकलन केंद्रावर छापा टाकण्यात आला आहे. दरम्यान यावेळी घटनास्थळावरून 600 लिटर भेसळयुक्त दूध तसेच भेसळीसाठी वापरण्यात येणारे रसायन जप्त करण्यात आले असून, हे भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच या दोन्ही दूध संकलन केंद्राचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत.
250 ते 300 लिटर कृत्रिम दुधाची विक्री
हे दोन्ही व्यवसायिक दररोज 750 ते 800 लिटर दूध शेतकऱ्यांकडून खरेदी करायचे, मात्र त्यामध्ये 250 ते 300 लिटर कृत्रिम दूध मिसळून 1000 लिटर दूध विकायचे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.