अहमदनगर - अखंड विश्वातील मानवजातीवर आलेले कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, कोरोना जगातून कायमचा हद्दपार होऊ दे, अशी प्रार्थना करुन प्रभु येशु ख्रिस्त यांच्या मातोश्री संत मारिया यांच्या यात्रोत्सवाचे ध्वजारोहण करण्यात आले. दरवर्षी सेंट मेरी म्हणजेच संत मारिया यांच्या जन्मोत्सवानिमित्त ग्रामीण महाराष्ट्रातील ख्रिस्त बांधवांची पंढरी अशी ख्याती असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील हरेगाव येथे भव्य यात्रोत्सव साजरा केला जातो.
लाखोंच्या संख्येने राज्य आणि परराज्यातील येशुभक्त येथे येतात. राज्यातील मुंबईतील माऊंट मेरीनंतर हरेगाव हे दुसऱ्या क्रमांकाचे तीर्थक्षेत्र आहे. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या दहा भाविकांच्या उपस्थितीत नाशिक धर्मप्रांताचे व्हीकर जनरल फा. वसंत सोज्वळ यांच्या हस्ते पवित्र मारिया मातेचा ध्वज फडकाऊन यात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख धर्मगुरू फा. वसंत सोज्वळ, फा. पायस, फा. डॉमणिक आदींनी प्रारंभी अखंड विश्वातील मानवावर आलेले कोरोनाच्या महामारीचे संकट टळू दे अशी प्रार्थना केली. त्यानंतर संत मारिया ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ख्रिश्चन धर्मगुरु फादर बादर यांनी ७२ वर्षांपूर्वी ही परंपरा सुरु केली, ती आजतागायत कायम आहे. यंदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिरे बंद असल्याने भाविकानी घरी बसुन यात्रोत्सव साजरा करावा असे आहवान धर्मगुरू फादर पायस यांनी केले आहे