अहमदनगर - महानगरपालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड अखेर आज करण्यात आली. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाकडून प्रत्येकी दोन तर भाजपकडून एक या पद्धतीने दिलेली नावे आयुक्तांनी छाननीनंतर मंजूर केली. मात्र, निवड झालेल्या व्यक्ती या 'स्वीकृत'च्या निकषात बसत नसल्याने या निवडींना न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
अहमदनगर महानगरपालिकेत जवळपास गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड आज आयुक्तांनी घोषित केली. मधल्या काळात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयुक्तपदाचा भार असताना त्यांनी निकषात बसत नसल्याचे कारण देत स्वीकृतसाठी पक्षांनी दिलेली नावे रद्द ठरवली होती. मात्र, आज बहुतांशी तीच नावे सध्याचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी निकषात ग्राह्य मानत या नावांना मंजुरी दिली. या निवडीचे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांनी स्वागत केले आहे.
हेही वाचा - सोन्यासारख्या चार एकर झेंडूवर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ, बाजारभाव नसल्याने शेतकरी वैतागले
आज झालेल्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विपुल शेटिया आणि अॅड. राजेश कातोरे, शिवसेनेकडून संग्राम शेळके आणि मदन आढाव, भाजपकडून रामदास आंधळे यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केल्याची घोषणा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेच्या सभेत केली. मात्र, या निवडीला सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत या निवडींना न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले आहे.
निकषात बसत नसल्याने ज्या नावांना जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. तिच नावे आज मनपा आयुक्तांनी मंजूर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. स्वीकृतसाठी शहरात अनेक विविध क्षेत्रातील तज्ञ, सामाजिक कार्यात आणि नगरच्या विकासाबाबत जागृत असलेली मंडळी असताना सर्वच पक्षांनी आपल्या सोयीच्या व्यक्तींना संधी दिली आहे. वास्तविक हेच चित्र राज्यभरातही अनेकदा दिसून येते. मात्र, आता सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयात जाण्याचे जाहीर केले असल्याने स्वीकृत नगरसेवकांचा विषय यापुढेही चर्चेत राहणार अशीच एकंदरीत परस्थिती आहे.
हेही वाचा - कोविड रुग्णालयांकरिता 'सेन्ट्रल ऑक्सिजन टँक' उभारणारे प्रवरा मेडिकल एकमेव - डाॅ.राजेंद्र विखे-पाटील