अहमदनगर - मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडवनीस हेच देऊ शकतात, असे मत रयत क्रांती संंघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीने न्यायालयात मराठा आरक्षणाबाबतची बाजू योग्य पद्धतीने मांडली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी धनगर आरक्षण आणि दूध दरवाढीच्या मागणीवरूनही सरकारवर निशाणा साधला आहे.
संगमनेर तालुक्यातील साकुर येथे रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयात फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण या सरकारला टिकवता आले नाही. त्यामुळे राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालायत आपली बाजू योग्य पद्धतीने मांडली नसल्यानेच आरक्षण रद्द झाले असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतात, असा विश्वासही सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.
दूधासाठी हमीभावाची तरतूद करावी-
मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर आरक्षणाचाही प्रश्न सध्या प्रलंबित आह. धनगर समाजाच्या आरक्षणाकडेही महाविकासआघाडीने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. याच बरोबर या सरकारने दुध दराच्या बाबतीतही बोलताना खोत म्हणाले की, २५ तारखेला दुग्ध विकास मंत्र्यांसोबत बैठक होत आहे. या बैठकीत दुधाला आधारभूत किंमत मिळायला हवी. त्यासाठी कायदा संमत करावा, जर एखाद्या दूध डेअरी प्रकल्पाकडून हमी भाव नाही मिळाला तर त्यावर कारवाई होईल, अशी तरतूद व्हावी अशी मागणी शेतकरी संघटना करणार आहे