शिर्डी - दोन-तीन वर्षांपासून सततची नापिकी आणि यावर्षी पेरलेले मका बियाणे उगवले नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. बाबा महादू मगर (वय ७४) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते राहता तालुक्यातील गोगलगावचे रहिवासी आहेत.
गोगलगाव शिवारात संगमनेर रस्त्यावर मगर या वृद्ध शेतकऱ्याची दोन एकर शेतजमीन आहे. याच जमिनीत १५ दिवसांपूर्वी मगर यांनी मक्याचे बी पेरले होते. मात्र, दोन आठवडे उलटून गेले तरी मक्याचे बी उगवले नाही. त्यामुळे मगर चिंतेत होते. यातूनच आलेल्या नैराश्यातून त्यांनी शनिवारी (जुलै १३) सकाळी ८ वाजता गोचिड मारण्याचे विषारी औषध सेवन केले.
मगर यांच्या मुलांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सोमवारी रात्री या वृद्ध शेतकऱ्याचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी आहे. दरम्यान, या घटनेबाबत गोगलगावचे तलाठी बी. एफ. कोळगे यांनी कृषी पर्यवेक्षण अधिकारी नारायणराव लोळगे व कृषी सहायक सचिन गायकवाड यांना सोबत घेत मक्याचे बी का उगवले नाही याबाबत पंचनामा केला.