अहमदनगर - परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे ऐन भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ही घटना घडली. दशरथ सुभान वाघमारे (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
गेल्या १० दिवसांपासून तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे दशरथ वाघमारे यांच्या तीन एकर शेतातील कांदा आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ते गेल्या ५-६ दिवसांपासून तणावात होते. मंगळवारी सकाळी कुटुंबीयासह दिवाळीचा फराळ घेतल्यानंतर त्यांनी शेतात फेरफटका मारला. मात्र, पावसामुळे झालेले नुकसान त्यांना सहन झाले नाही. लागवडीच्या काळात घेतलेले सरकारी सोसायटी व पतसंस्थांचे कर्ज कसे फेडायचे? याची चिंता त्यांना होती. त्यातूनच त्यांनी बुधवारी राहत्या घरात गळफास घेतला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.