अहमदनगर - राज्यात ऊर्जा विभाग सध्या खासगीकरणाच्या मुद्यावरुन चर्चेत आहे. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे 20 व्या द्विवार्षिक महाअधिवेशन आज (मंगळवारी) शिर्डीत पार पडले आहे. या महाअधिवेशन कार्यक्रमाला ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात भाषण करतांना आपल्या कुटुंबाची व्यथा सांगताना नितीन राऊत भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तराळल्याचे दिसून आले. कामगारांनी माझ्याकडे मागण्या केल्या आहे, मी तुमचा कुटुंब प्रमुख न्याय देण्याचे काम करेल, असे आश्वासन राऊत यांनी कामगारांना दिले आहे.
राज ठाकरेंना टोला : साईबाबा कुणा एकाचे मार्गदर्शक अथवा दैवत नाहीत. त्यांनी कोण्या एका समाजाची ओनरशिप घेतलेली नाही. अशा श्रद्धा सबुरीच्या देवस्थानामध्ये साईनाथाचे आशीर्वाद घेण्यासाठी जे लोक येतात, ते सर्व धर्माचे असतात. सर्व राज्यांचे असतात ते अनेक देशांचे असतात जे कोणी धर्माचा आव आणून भोंग्यासंदर्भात बोलत असतील त्यांनी कृपया श्रद्धा सबुरी बाळगावी, असा टोला नितीन राऊत यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला.
केंद्र सरकारवरही टीका : केंद्राने आणलेला ठराव काय म्हणतो. त्या ठरावामध्ये काय माहिती आहे. केंद्र जर खासगीकरणाकडे जात नसेल तर कालच दादरा नगर हवेलीमध्ये प्रधानमंत्र्यांनी तेथिल वीज वितरण प्रणाली आदानी व टोरेंट कंपनीला दिली. मग हे काय खासगीकरण नाही तर सरकारीकरण आहे काय? असा सवाल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी खासगीकरणाच्या मुद्यावरुन उपस्थित केला. 2014 मध्ये आम्ही 14 हजार कोटी थकबाकी असताना तुमच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात ती 51 हजार कोटीच्यावर गेली. त्याला कोण कारणीभूत आहे. ज्यावेळी कोराडी थर्मल पावर प्लांटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या मंत्र्यांकडे व संचालकांकडे बोट दाखवत सांगितले होते की यांच्याकडे जरा लक्ष ठेवा. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर निश्चित लक्ष ठेवले असेल म्हणून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले नव्हते, असा टोलाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपा नेत्यांना लगावला.
हेही वाचा - SIT to probe ED: ईडी अधिकाऱ्यांवर संजय राऊतांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटीचे गठन