शिर्डी - संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा अकलापूर परिसरात आज (सोमवार) सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. 2.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा धक्का असल्याचे भू-वैज्ञानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा - घोटविहिरा परिसरात भूकंपाचे धक्के; भूस्खलनाच्या भीतीने उंमरमाळ पाड्याचे 15 कुटुंब स्थलांतरीत
बोटा परिसरात गेल्या वर्षीही ऑगस्ट महिन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात भूकंपाचे धक्के बसले होते. त्यावेळी या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आज पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
हेही वाचा - काळ्या जादूतून मुक्त होण्यासाठी ३ वर्षाच्या मुलीला ७व्या मजल्यावरून फेकल्याची आरोपीची कबुली
या भूकंपाची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापन यंत्रात झाली असून, त्याची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल असल्याची माहिती वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी दिली आहे.
मागील वर्षी 2018 ला संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव, माहुली, नांदूर खंदरमाळ, बोरबन, कोठे आदी परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. यावेळी घारगाव परिसरात भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील मेरी संस्थेचे शास्त्रज्ञ, संगमनेरचे तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी भेट देऊन नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले होते.