अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील धोत्रे परीसरात काल संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे ढगफुटी झाल्याचा अनुभव या परिसरातील नागरीकांना आला. तसेच कोपरगाव-येवला तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या ओगदी येथील मातीचा सर्वात मोठा बंधारा पहिल्याच पावसात भरला आहे. पाण्याचा अचानक लोंढा येऊन बंधारा ओसंडून वाहू लागल्याने गावकरी आचंबित झाले.
कोपरगाव तालुक्यातील ओगदी हे गाव येवला सीमेवर असून सायंकाळच्या दरम्यान येवला तालुक्यातील उंदिरवाडी व इतर गावात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कोळ नदीवर असणारा ओगदी गावचा बंधारा पूर्ण भरला असून ओसंडून वाहत आहे. येवला तालुक्यातील अंदरसुल, बोकटे, देवळणे, दुगलगाव या गावांचा परिसर हा कोळ नदीचा उगमस्थान आहे. हीच नदी कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव, तीळवणी, लौकी, भोजडे, वारी या गावांतून वाहत गोदावरीला मिळते. या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नदीला पूर आला असून बंधाराही भरला आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये, असे प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागतींच्या कामांमध्ये व्यस्त असून पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे.