अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील पठारभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील शेळ्या-मेंढ्यांना खाण्यासाठी काहीच नसल्यामुळे त्यांना बाभळीचे डहाळे करून आपली भूक भागवावी लागत आहे. दुष्काळी परिस्थितीत पशुधन कसे सांभाळायचे यासाठी कसरत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
संगमनेर तालुक्याचा पठारभाग हा डोंगराळ असल्याने या परिसरातील काही भागात नेहमीच दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो. पठारभागातील वनकुटे, कुरकुंडी, रणखांब, पिंपळगाव देपा, पोखरी बाळेश्वर, सारोळे पठार, बोटा, साकुर, अकलापूर, माळेगाव पठार आदी गावांच्या वाड्यावस्त्यांवर येथील जनता पाणी टंचाईने हैराण झाली आहे. दररोज टँकर येतात. मात्र ते अपुरे पडतात. त्यामुळे पशुधन कसे सांभाळायचे असा प्रश्न येथील पशुपालक शेतकऱ्यांना पडला आहे.
उन्हाळा संपयाला अजून तीन ते चार महिने आहेत. हा काळ कसा काढायचा असाही यक्षप्रश्न येथील शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे. आम्ही मुलांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला. सोबतच जनावरांवर केलेला खर्च वसूल होत नसल्याने उदरनिर्वाह कसा करावा, मुलांचे शिक्षण आणि जनावरांचा चारा व पिण्यासाठीचे पाणी अशा संकटांचा सामना कसा करावा या चिंतेत येथील शेतकरी वर्ग आहे.