अहमदनगर : पारनेर तालुक्यातील गोरेगाव इथे घराची राखण करत असलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला ( pet dog was attacked by leopard ) केला. त्याला ओढत नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बिबट्याच्या या हल्ल्याचा ( Leopard hunt to dog ) सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल झाले असल्याने गोरेगाव, किन्ही, बहिरोबावाडी, करंदी आदी परिसरात नागरिकांत बिबट्याच्या दहशतीचे वातावरण आहे. व्हायरल सीसीटीव्ही फुटेज गोरेगाव इथले असल्याची माहिती येत असून त्यात रात्रीच्यावेळी गेटच्या घराच्या पुढील पोर्च मधे निवांत झोपलेल्या कुत्र्याचा वेध घेत बिबट्या येतो, कुत्रा झोपलेला असल्याने बिबट्या त्याच्यावर झडप घालून त्याला ओढत बाहेर घेऊन जाताना तसेच रोडवर त्याचा फडशा पाडताना दिसून येत आहे.
पारनेर,अकोले,नेवासे परिसरात बिबट्याची दहशत : जिल्ह्यांत बिबट्यांचा वावर वाढला असून, शेतकर्यांच्या पाळीव प्राण्यांना भक्ष्य केले जात आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीवप्राण्यांवरील हल्ल्यांच्या घटनाही वाढल्या आहेत. पारनेर तालुक्यातील किन्ही, बहिरोबावाडी, गोरेगाव, करंदी या गावांच्या परिसरात गेल्या वर्षभरापासून बिबट्यांचा वावर आहे.
कुत्रे, शेळ्या, कोंबड्या लक्ष : आतापर्यंत बिबट्याने पाळीव कुत्रे, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, मेंढपाळ बांधवांच्या घोड्यांना भक्ष्य केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मागील वर्षी किन्ही येथे एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढून जंगलात सोडले होते. तसेच, गोरेगावातही एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले; परंतु तरीही या परिसरात अजुनही काही बिबट्यांचा वावर असून, त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
नागरिकांत दहशत : यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पाथर्डी तालुक्यातील केळवंडीची घटना ताजी असताना किन्ही येथील भाऊसाहेब पांडुरंग खोडदे यांच्या गोठ्यामध्ये घुसून बिबट्याने पाच शेळ्यांचा फडशा पाडला होता. दरम्यान वनविभागाने नागरिकांना काही सूचनाही केल्या आहेत. बिबट्या मानवी वस्तीकडे सहज खाद्याच्या शोधार्थ येतो. यामध्ये कुत्री-मांजरांपासून शेळ्या मेढ्यांचा समावेश आहे. त्यामुळे बिबट्या आपल्या घराकडे येण्यापासून मज्जाव करण्यासाठी काही उपाययोजना आखणे आवश्यक आहेत. यामध्ये पाळीव प्राण्यांसाठी बंदिस्त गोठा किंवा पिंजरा तयार करावा. जेणेकरून त्याला भक्ष सहजपणे मिळणार नाही. असे केल्यास बिबट्याला तुम्ही केलेल्या या कृतीची जाणीव होते. त्याला खाद्य मिळणे बंद झाल्याने काही दिवसांमध्ये तो घराकडे येणे बंद करतो.