शिर्डी Diwali 2023 : सबका मलिक एक' असा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या मंदिरात वर्षभरातील सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. दिवाळीचं लक्ष्मीपूजनही मोठ्या आनंदानं साईमंदिरात साजरं करण्यात आलं. यावेळी साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी पूजा केली. साई समाधी समोर वेदांच्या मंत्रघोषात पारंपरिक पद्धतीनं पूजा झाली.
साईमंदिरासमोर फुलाची सजावट : दरवर्षी हा दिवाळीचा सण मोठ्या उत्साहानं शिर्डीत साजरा केला जातो. साईबाबांना भाविकांनी अर्पण केलेली सुवर्ण आभूषणं, चोपडीचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर धुपारती पार झाली. दिपावाळी निमित्तानं साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. बाबांच्या मूर्तीला आज खास श्रृंगार परिधान करण्यात आला आहे. साईमंदिरासमोर फुलाची सजावट करत त्यावर दिवे लावण्यात आले आहेत. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी सुमारे साडेसहा हजार कर्मचारी, अधिकारी तैनात आहेत. लक्ष्मीपूजनानिमित्त शिर्डीत कुटुंबांतील अनेकांच्या घरात लक्ष्मी पूजनाबरोबरच साईंचाही फोटो ठेवून पूजन केलं जातं.
साईदर्शन घेऊन लक्षी पूजन : साई मंदिरातील लक्ष्मीपूजनाचा थाटमाट काही औरच असतो. पूजेसाठी सोन्याचं ताट, पंचारती, घंटी, समई, निरंजन, पळी-पंचपात्र, पाट, भांडीही सोन्याची असतात. बाबांच्या मूर्तीवर रत्नजडित सुवर्णहार, असे चार कोटीचे दागिणे घालन्यात आले होते. शंभर किलो वजनाच्या सोन्यानं मढविलेलं साईंचं सिंहासन, सुवर्णतेजानं तळपणारा साई मंदिरावरील सुवर्णकळस बाबांच्या दरबारातील वैभवाची साक्ष देत होता. बाबांच्या दरबारात सदैव रिद्धी-सिद्धी नांदत असते, या श्रद्धेनं अनेक भाविक बाबांच्या दरबारातील लक्ष्मीपूजनात आपलं पैशाचं पाकीट ठेवतात. पूजेनंतर ते ठेवणाऱ्यांच्या हवाली केलं जातं. लक्ष्मीपूजनाचा दिवस साईदर्शन घेऊन साजरा करणारे अनेक भाविक या निमित्तानं शिर्डीत येतात.
पारंपरिक पद्धतीनं पूजा : देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. साईंच्या शिर्डीत तीन दिवस दीपोत्सव साजरा केला जातो. साई मंदिर परिसरात आकर्षक आकाश कंदील लावण्यात आले आहे. साई मंदिर भक्तांनी लावलेल्या हजारो दिव्यांनी उजळून निघाले आहे. दिवाळीनिमित्त साईबाबांचे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं असून आज साई मंदिरात पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मी, कुबेराची पूजा करण्यात आली.
हेही वाचा -
- Diwali Festival 2023: साईंच्या दरबारी आज मोठ्या थाटात होणार लक्ष्मीपूजन; जाणून घ्या कशा-कशाची होणार पूजा
- Diwali Festival 2023 : दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो.
- Diwali 2023 : साई मंदिरात 'दिवाळी'; शिर्डीत अकरा हजार दिवे प्रज्वलीत करत 'सबका मालिक' एकचा दिला संदेश