अहमदनगर - जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यातील एकूण ७०५ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा निवडणूक शाखेने भयमुक्त, निर्भय आणि शांततापूर्ण मतदान होण्यासाठी कंबर कसली आहे. शुक्रवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आज पथकांची रवानगी करण्यात आली. सर्व ठिकाणी तालुक्याचे तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली या पथकांना एकत्रित करून त्या ठिकाणी आदर्श निवडणूक प्रक्रियेच्या सूचना देत त्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले.
राळेगणसिद्धी, हिवरेबाजार कडे जिह्याचे लक्ष -
जिल्ह्यातील ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या, तरी ज्या आदर्शगाव असलेले राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजारमध्ये यंदा निवडणुका आहेत. स्थानिक पातळीवर काही गटांनी निवडणुकीचा आग्रह धरल्याने समाजसेवक अण्णा हजारे आणि आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या गावात निवडणूक प्रक्रिया मतदानातून होत आहे. अण्णा थेट निडणूक रिंगणात कधीच राहिलेले नाहीत. मात्र, पोपटराव पवार हे या निवडणुकीत उमेदवार आहेत. आता राज्याला येथील निकालाची उत्सुकता आहे.
मतदार बजावणार मतदानाचा हक्क -
जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे. यामध्ये एकूण १३ लाख ६२ हजार ८८८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये ६,४८,५३३ महिला, तर ७,१४,३४६ पुरुषांचा समावेश आहे.
उमेदवार नसल्याने निवडणूका रद्द -
अहमदनगर जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायती असून यापैकी ५३ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहे. त्यामुळे ७०५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. तर ३९ वार्डाच्या निवडणूका या उमेदवार नसल्याने रद्द करण्यात आल्या आहेत.