अहमदनगर - संगमनेर नगरपरिषद तसेच लोकशाहीर विठ्ठल उमप विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने लोकशाहीर विठ्ठल उमप गौरव पुरस्कार नंदेश उमप यांना देण्यात आला. तर संगमनेरचे भूमिपूत्र तमाशा कलावंत रघुवीर खेडकर आणि नाट्यकलावंत सोमनाथ मुटकुळे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कवी अनंत फंदी नाट्यगृहात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि नंदेश उमप तसेच संपूर्ण उमप परिवाराच्या उपस्थीतीत आनंद फंदी नाट्यगृह प्रवेशद्वारास लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे नाव देण्यात आले. या प्रवेशद्वाराचे उद्घाटनही बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
विठ्ठल उमप यांचे संगमनेर शहराजवळील चिकणी जन्म गाव आहे. त्यामुळे उमप परिवारचे संगमनेराशी जवळचे नाते राहिले आहे. रविवारच्या पुरस्कारप्रसंगी नंदेश उमप यांनी आपल्या वडिलांनी संयुक्त महाराष्ट चळवळीच्या वेळी गायलेली माझी मैना गावाकडे राहिली गाऊन आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला.