अहमदनगर - शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामस्थांनी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या विविध घटकांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला वितरित केला आहे. या कोरोना योद्ध्यांचे आरोग्य अधिक निरोगी असावे राहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. माणुसकीचा एक दीपस्तंभ या उपक्रमांतर्गत पत्रकारांनाही या भाजीपाला किटचे वितरण करण्यात आले.
वाघोली परिसरातील आरोग्य, बीज, बँक कर्मचारी, त्याचबरोबर शहर पोलीस दल यांना या भाजीपाला किटचे वितरण करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या संकटात शेतकरी वर्ग भरडला गेला आहे. मात्र, तरीही हा मोठ्या मनाचा बळीराजा हतबल न होता शेतशिवार पिकवत आहे. त्याचबरोबर मनाचा मोठेपणा दाखवत आपले समाजभान आणि जबाबदारीही जपत आहे.
या भाजीपाला किटचे वाटप करताना वाघोलीचे सरपंच बाबासाहेब गाडगे, उपसरपंच बापू चितळकर, उमेश भालसिंग, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, सुधीर लंके यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.