अहमदनगर- मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनआयएने अटक केली आहे. तर दुसरीकडे रेखा जरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठेच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणामुळे सध्या पारनेर तालुक्यातील जातेगावचा घाट आणि त्या घाटातून १८ वर्षापूर्वी फरार झालेला ख्वाजा यूनसचे गूढ प्रकरण पुन्हा एकदा जिल्ह्यात चर्चेत आले आहे. वझे यांच्या कारकिर्दीला वादग्रस्त ठरवण्यात हाच घाट कारणीभूत ठरला आहे. तर रेखा जरे यांची हत्या करण्यासाठी देखील याच घाटाची निवड करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर जातेगाव घाटातील ख्वाजा य़ुनूस प्रकरणाचा ईटीव्ही भारतने घेतलेला विशेष आढावा..
उत्तर महाराष्ट्रातला अहमदनगर जिल्हा.. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला भौगोलिक दृष्ट्या जोडणारा दुवा. पुण्याहून औरंगाबादला जाण्यासाठी नगर जिल्ह्यातूनच जावे लागते. याच मार्गावर दरम्यान येणाऱ्या पारनेर तालुक्यातील जातेगाव घाट हा अनेकदा मोठ्याच चर्चेत राहिला आहे. सध्या राज्यात गाजलेले रेखा जरे निर्घृण हत्या प्रकरण असो की 2002 सालचे ख्वाजा युनूस पलायन प्रकरण!! हा जातेगाव घाट नेहमीच एक गूढ घटनांनी प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे.
काय आहे सचिन वझे आणि ख्वाजा युनूस प्रकरण-
सध्या सचिन वझे यांना अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनीयुक्त कार प्रकरणी आणि त्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र, जातेगावच्या घाटातील एका घटनेनतही त्यांच्याकडे संशयाने पाहिले जात होते. त्यासाठी त्यांच्यावर निलंबनाचीही कारवाई करण्यात आली होती. घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणात ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. ख्वाजा युनूस हा मूळचा परभणी जिल्ह्यातील. त्याला तपासकामी सचिन वझेसह मुंबई पोलीस दलाचे चार अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईहुन पुणे मार्गे औरंगाबाद कडे 25 डिसेंबर 2002 रोजी सायंकाळी निघाले. पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत तत्कालीन पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाटेत असलेल्या जातेगाव घाटात मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांची जिप्सी कार घाटात अचानक पलटी होते, सचिन वझेसह चारही अधिकारी किरकोळ जखमी होतात, मात्र त्याच वेळी पोलिसांच्या ताब्यात असलेला ख्वाजा युनूस हातातील बेड्यांसह जातेगाव घाटातून फरार होतो. सचिन वझे पारनेर पोलीस ठाण्यात येऊन या घटनेची तक्रार दाखल करतात आणि नंतर नगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेऊन नंतर मुंबईला निघून जातात.
जंग-जंग पछाडूनही ख्वाजा युनूस सापडलाच नाही-
जातेगाव घाटातून ख्वाजा युनूस बेडयांसह फरार झाल्यानंतर पारनेर आणि नगर जिल्हा पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी मोठी मोहीम राबवली. जातेगाव घाट परिसरातील जंगल, शेत-शिवारात, विहिरीवर पाणी पिताना हातात बेड्या घातलेली व्यक्ती दिसल्याच्या अफवा रोज पसरत होत्या. पोलीस प्रत्येक ठिकाणी जात खातरजमा करत होते, मात्र पोलिसांना ख्वाजा युनूस कुठेच आढळून आला नाही. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्याला शोधून मदत करणाऱ्यास रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणी सचिन वझे आणि इतर चार अधिकाऱ्यांना अनेकदा पारनेर पोलीस ठाण्यात आणि पारनेर न्यायालयात हजेरी लावावी लागली.
ख्वाजा युनूसच्या आईच्या तक्रारी वरून वझे आणि टीमचे निलंबन-
दरम्यान, ख्वाजा युनूसच्या आईने न्यायालयात तक्रार करून पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असावा आणि तो लपवण्यासाठी पोलिसांनीच जातेगाव घाटात अपघात आणि फरार नाट्य रंगवल्याचा आरोप झाला. या प्रकरणात अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार तीन मार्च 2004 ला सचिन वझे, राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम या चार मुंबई पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले, या एकूणच प्रकरणाचा खटला सध्याही न्यायप्रविष्ट आहे.
सोळा वर्षानंतर सेवेत पुन्हा रुजू झालेले वझे पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात-
तब्बल सोळा वर्षे निलंबित राहिल्या नंतर 6 जून 2020ला मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आदेशाने सचिन वझेसह ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित असलेल्या चारही अधिकाऱ्यांना मुंबई पोलीस सेवेत हजर करून घेण्यात आले. मात्र काही महिन्यातच सचिन वझे मनसुख हिरेन यांच्या गूढ मृत्यूने चर्चेत आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकले. एनआयए'ने त्यांच्यावर आता कारवाईही सुरू केली आहे. मात्र ख्वाजा युनूस, नगर जिल्ह्यातील पारनेर जातेगाव घाट आणि वादग्रस्त सचिन वझे हे प्रकरण नगर जिल्ह्याला पुन्हा आठवले आहे.
रेखा जरे यांचीही जातेगाव घाटातच झाली हत्या-
सन 2002 साली ख्वाजा युनूस पलायन प्रकरणाने जातेगाव घाट राज्यभर आणि देशभर चर्चेत आला होता. अनेक राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी या घाटात आणि परिसरात तळ ठोकून वृत्तांकन करत होते. तोच जातेगाव घाट अठरा वर्षानंतर पुन्हा चर्चेत आला तो यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने. या प्रकरणात मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे हा वरिष्ठ पत्रकार असून घटनेवेळी तो एका राज्यातील आघाडीच्या वृत्तपत्राचा निवासी संपादक होता. रेखा जरे यांच्या हत्येनंतर फरार झालेल्या बाळ बोठेला अखेर पोलिसांनी शनिवारी (13 मार्च)ला थेट हैदराबाद मध्ये अटक करण्यात यश मिळवले आणि त्याला पारनेर पोलीस ठाण्यात आणून कोठडीत टाकले. एकूणच जातेगाव घाट आणि त्याभोवती झालेल्या या दोन घटना सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय आहेत.