अहमदनगर - तीन वर्षांपूर्वी इंदौरच्या दिप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. यानंतर पती मनोज सोनीने यांनी शिर्डीतून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची आकडेवारी माहिती अधिकारातून मागवली. तसेच या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलीस पथकाकडून जागोजागी दिप्ती सोनीचा शोध घेण्यात आला होता.
पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही. यामुळे न्यायालयाने शिर्डातून मानव तस्करी होते का, या अनुषंगाने तपास करण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या. तसेच तीन वर्षांनंतरही दिप्ती न सापडल्याने पोलीस तपासावरच ताशेरे ओढले. मागील आठवड्यात दिप्ती सोनी इंदौरमध्येच असल्याचे कळले. तिच्या बहिणीकडे गेल्यानंतर सर्व कुटुंबीयांना ती सापडल्याचे समजले. या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर दिप्ती ही आपला प्रियकर ओमप्रकाश चंदेलसोबत राहत असल्याचे उघड झाले आहे.
लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध... आणि शिर्डीत साधली संधी!
विवाहापूर्वी दिप्ती आणि चंदेलचे प्रेमसंबध होते. पण इच्छेविरुद्ध तिचा विवाह मनोज सोनीसोबत झाला. पण प्रेमासाठी दिप्तीने पळून जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मार्ग शिर्डीतून नेण्याचे तिने निश्चित केले; आणि संधी मिळताच डाव साधला. या घटनेमुळे मनोज सोनी यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आपली पत्नी बेपत्ता झाली म्हणून मनोज यांनी तिला शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मात्र ती सापडत नसल्याने मनोज सोनी यांनी दोन वर्षांत शिर्डीतून गायब झालेल्या व्यक्तींची आकडेवारी मागवली.
त्याच्या आधारावर औरंगाबाद उच्च न्यायालयात एक रिट पीटिशन दाखल केली. याच्या सुनावणीच्या दरम्यान हायकोर्टाने पोलिसांना फटकारत शिर्डीतून मानवी तस्करी अथवा मानवी अवयावांची तस्करी होतेय का, या बाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतरही पोलिसांनी दिप्ती सोनीचा तपास करून ती सापडत नसल्याचे समोर आले. मागील आठवड्यात त्या अचानक बहिणीकडे वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले.
"मला काही आठवत नाही"... बनाव उघडकीस!
दिप्ती सोनीच्या मीसींगच प्रकरण हायकोर्टात असल्याने त्या सापडल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्यांना न्यायालयात सादर देखील करण्यात आले. मात्र तीन वर्षे त्या गायब झाल्यानंतर कुठे राहात होत्या, याचा तपास पोलिसांना करण्याचे आदेश देण्यात आले. तपासादरम्यान सोनी या खोटं बोलल्या. काहीच आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा उलटा तपास सुरू केला. आणि कसून चौकशी केल्यानंतर त्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे उघडकीस आले.
साडेतीन वर्षांपूर्वी शिर्डीच्या दिप्ती सोनी बेपत्ता झाल्या. त्या आधी त्याचा संपर्क त्याचा प्रियकर ओमप्रकाश चंदेलशी होता. शिर्डीतून गायब झाल्यानंतर काही काळ इंदौर आणि देवास येथे दिप्ती आणि ओमप्रकाश राहत होते. दिप्ती सोनी गायब प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र या प्रकरणाने वेगळाच रंग घेतल्याने आता सर्व प्रकरणावर प्रकाश पडला आहे.
पत्नी बेपत्ता झाल्यापासून साडेतीन वर्षांचा प्रवास
मध्यप्रदेशातील इंदौरच्या दिप्ती सोनी 10 ऑगस्ट 2017 रोजी शिर्डीतून बेपत्ता झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने दिप्ती यांचे पती मनोज सोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. 38 वर्षीय दिप्ती सोनी पती मनोज सोनी (वय 42 वर्ष) आणि मुलांसह 2017 मध्ये इंदौरहून शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. यानंतर त्या बेपत्ता झाल्या. दिप्ती सोनी गुरुवारी (17 डिसेंबर) संध्याकाळी इंदौरमधील बहिणीच्या घरी परतल्या, अशी माहिती मनोज सोनी यांचे वकील सुशांत दीक्षित यांनी दिली. दिप्ती सोनी सापडल्याची माहिती कोर्टाला देण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी यू देबडवार यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी (18 डिसेंबर) सोनी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी झाली.
औरंगाबाद खंडपीठाचे पोलीस तपासावर ताशेरे
दिप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ता झाल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी पोलीस आणि अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत फटकारलं होतं. शिर्डीत गेल्या चार वर्षांत अनेक जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून येथे मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले. औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी पोलिसांनी दाखल केलेला संपूर्ण तपासाचा 200 पानी अहवाल निरर्थक ठरवला. कोर्टाने यापूर्वी सलग दोनदा मानवी तस्करी किंवा अवयव चोरीच्या अंगाने तपास करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्यानंतरही तसा तपास केल्याचा चकार शब्दही अहवालात नाही, असं न्यायालयाने म्हटलं. मात्र मानवी तस्करीबाबत कोणतेही पुरावे अथवा तक्रार आजपर्यंत जिल्ह्यात दाखल नसून पुन्हा एकदा नव्याने या बेपत्ता प्रकरणी तपास सुरू केला आहे. असं उत्तर यावर पोलिसांनी दिलं.