अहमदनगर - केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात पंजाब व हरियाणासह देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. मात्र, केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यात या प्रश्नावर थेट बोलणी होत नसल्याने आंदोलन चिघळत आहे. त्यातून केंद्र सरकारचे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता होत आहे. यावरून ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केंद्राला चांगलेच फैलावर घेतले आहे.
शेतकरी आंदोलनावरून अण्णांनी थेट मोदी सरकारला प्रश्न केला आहे. निवडणुकीच्यावेळी मत मागायला शेतकऱ्यांच्या बांधावर जाता, तर मग शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना त्यांच्याशी चर्चा करायला का जात नाही. दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी हे पाकिस्तानातून आलेत का, असा प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा -
कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी ही वागणूक योग्य नाही. निवडणुका आल्या की राजकारणी मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच कधी घरी जाऊन मत मागतात. मग त्यांच्या मागण्यासंबंधी त्यांच्याशी सरकार चर्चा का करत नाही, शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे का मारले जात आहेत. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला आहे. तरीही अद्यापही शेतकरी संयमाने आंदोलन करीत आहेत. यातून हिंसा भडकली तर याला कोण जबाबदार असेल, असा प्रश्न करून त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली. दरम्यान कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरियाणातील शेतकरी ‘दिल्ली चलो’ आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला माझा पुर्ण पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.
आंदोलन सुरूच -
दिल्लीच्या सिंधू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावालाही शेतकऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकरी संघटनांना चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, शहा यांचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला. शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी दिल्ली व हरियाणाच्या सीमेवर असलेल्या निरंकारी समागम मैदानावर जाण्यासही नकार दिला. त्यामुळे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -'ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा; पाक आणि चीन शरण येईल'