अहमदनगर - सामाजीक न्याय मंत्रीपदी निवड झाल्यानंतर धनंजय मुंडे प्रथमच भगवानबाबा गडावर आले. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी त्यांना गडावर येण्याचे निमंत्रण दिले होते. यावेळी गडावर मोठ्या प्रमाणात पोलीस फौडफाटा होता. तसेच गडावर जय्यत तयारीही करण्यात आली होती. यावेळी धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केल्याचे पाहायला मिळाले.
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर भगवानबाबा गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांना आशीर्वाद दिले होते. तसेच मंत्री झाल्यावर गडावर बाबांच्या समाधीच्या दर्शनाला येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी मंत्री झाल्यानंतर प्रथमच आज गडावर येऊन समाधीचे दर्शन घेतले. पंकजा मुंडे आणि महंत यांच्यात वादाची किनार असताना मंहतांनी मुंडेंना आमंत्रण दिले होते.
धनंजय मुंडेंनी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांचा आशीर्वाद घेतला. या अनुषंगाने गडावर जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी पोलीस-प्रशासन उपस्थित होते, तसेच गडावर मोठ्या संख्येने धनंजय मुंडे समर्थक होते. ज्या गडावर यापूर्वी केवळ दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावाच्या घोषणा घुमत होत्या, त्याच गडावर आज धनंजय मुंडे यांच्या नावाचा जयजयकार सुरू होता.