अहमदनगर- देश विदेशातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांचे मंदिर कोरोना विषाणूमुळे १७ मार्चपासून बंद करण्यात आले होते. मात्र, बाबांचा दुरावा सहन करू शकत नसल्याने हजारो भाविक दिवसाकाठी साई समाधी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेवून स्वतःला धन्य मानत आहेत.
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळातील दोन महिने भाविकांनी ऑनलाइन दर्शन घेवून समाधान मानले. तर, जिल्हाबंदी असल्याने भाविक कुठल्या ना कुठल्या बहाण्याने शिर्डीला येतच होते. मात्र, आता जिल्हाबंदी आणि वाहनांसाठी ऑनलाइन पासेसची अट रद्द केल्याने भाविक साईनगरीची वाट धरू लागले आहेत. मुंबईसह इतर ठिकणांहून भाविक शिर्डीत दाखल होत आहेत. प्रवेशव्दार क्रमांक चार आणि चावडी लगतच्या बॅरिकेडींग समोरून साई मंदिराच्या कळसाला भाविक नतमस्तक होत आहेत.
सोशल डिस्टन्सिंग पाळत दर्शन
भाविक सोशल डिस्टन्सिंग पाळत प्रांगणात उभे राहून साईबाबांची मध्यान्ह आणि धूप आरती करतात. बाबांच्या समाधी मंदिराच्या कळसाकडे हात जोडून कोरोना विषाणूमुक्त होण्याची प्रार्थना करतात. तसेच, लगतच असलेल्या देणगी काउंटरवर देणगी करतात.
दिवसेंदिवस साई मंदिरातील गर्दी वाढू लागली असून भाविक साईंच्या दर्शनासाठी असूसले आहेत. सहा महिने उलटून गेल्याने नियमित शिर्डीला खेपा करणाऱ्या भाविकांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे, आधिक अंत न पाहाता राज्य सरकारने अटी आणि शर्थींवर साईबाबांचे मदिर खुले करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
हेही वाचा- श्रीरामपूर तालुक्यातील 257 बुथ प्रमुखांचे राजीनामे, जिल्हाध्यक्षांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप