अहमदनगर - कामिका एकादशीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे नगरीत लाखो भाविकांची गर्दी जमली आहे. ठिकठिकाणाहून आलेल्या दिंड्यांमुळे दिवसभरात पाच लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे.
आषाढ़ी वद्य कामिका एकादशी निमित्ताने श्री क्षेत्र नेवासे येथे लाखो भाविकांनी ज्ञानोबा माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या 'पैस खांबा'चे दर्शन घेतले. माऊलींच्या नगरीत पहिल्यांदाच गर्दीने हा उच्चांक गाठला आहे. दिवसभरात शेकडो दिंडयांनी हजेरी लावल्याने 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या गजराने नेवासे नगरी दुमदुमली होती. नेवासा प्रभात फेरी सकाळी 6 वा माऊलींच्या दर्शनासाठी दाखल झाली. यासाठी पहाटे चार वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती.
नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर तालुक्यातील अनेक दिंडयांनी या ठिकाणी उपस्थिती लावली होती. या दिंड्यांनी ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात ज्ञानोबा-माऊली, तुकारामांचा गजरात रिंगणासहीत फुगड्या सादर केल्या. संत ज्ञानेश्वर मंदिर प्रागंणाबाहेरील प्रवेशद्वारासमोर मुख-दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली होती.