अहमदनगर - देशभरात आज ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 'सबका मालिक एक' असा सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीतही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साईभक्तांनी सांताच्या टोप्या घालून सर्वधर्म समभाव राखण्याचा संदेश दिला आहे.
ख्रिसमसच्या निमित्ताने शाळा आणि सरकारी कार्यालयांना सुट्ट्या असल्याने अनेक भाविकांनी शिर्डीला येणे पसंद केले आहे. अनेकांनी त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना केल्या. पंजाबच्या जालंधर येथून आलेल्या तीस साईभक्तांनी डोक्यात सांताक्लॉजच्या टोप्या घालून साई मंदिरात ख्रिसमस साजरा केला.
हेही वाचा - गोव्यात नाताळ सणाचा उत्साह; मध्यरात्री चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी भाविकांची गर्दी
साईबाबांनी शिर्डीतून 'सबका मालिक एक' असा संदेश दिला आहे. आम्हीही बाबांची लेकरे असून हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई आपण सगळे बांधव आहोत, अशी प्रतिक्रिया या भाविकांनी दिली आहे.