अहमदनगर - जिकडे सूर्य उगवतो तिकडे पळतात. यावेळी त्यांना वाटले सूर्य तिकडे उगवेल म्हणून ते तिकडे गेले. मात्र, यावेळी सूर्य नेमका उलट्या दिशेने उगवला, असा मार्मिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना लगावला आहे. कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे आयोजित महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारीत समाधान योजना, सृजन शासकीय योजना शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अजित पवारांनी राधाकृष्ण विखे आणि माजी पालकमंत्री राम शिंदे यांना आपल्या खास शैलीत मार्मिक टोला लगावला. राहाता मतदारसंघाचा उल्लेख करताना ते म्हणाले, त्यांना वाटले सूर्य तिकडे उगवेल म्हणून ते तिकडे गेले आणि सूर्य नेमका इकडे उगवला. अजित पवारांचे हे बोल ऐकताच सभेत एकच हशा पिकला. यावेळी माजी पालकमंत्री राम शिंदे यांचीही अजित पवारांनी फिरकी घेतली. त्यांचा पेहराव, देहबोली तसेच त्यांनी शासकीय निवास्थानावर केलेल्या खर्चावर बोचरी टीका अजित पवारांनी केली.
सभेमध्ये ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, शिबिराचे आयोजक आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी यावेळी उपस्थित होते.