शिर्डी (अहमदनगर) - मागेल त्याला हक्काचे घर या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला राहाता तालुक्यातील लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष कृतीत उतरवून ६० कुटूंबियांना त्याच जागेवर हक्काच्या घराचा आधार मिळवून दिला आहे. भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झालेला सिंधूताई विखे पाटील निवाऱ्याचा पथदर्शी गृहप्रकल्प देशापुढे ग्रामीण विकासाचा अनोखा उपक्रम ठरला आहे. लोणी बुद्रूक गावात शासकीय जागेवरच आदिवासी व इतर समाजातील कुटूंब गेली अनेक वर्षांपासुन राहात होती. पंचायत समितीच्या माध्यमातून शासकीय योजनेतील घरकुल या कुटूंबियांना मंजुरही होत होती. परंतू ही जागा त्यांच्या नावे नसल्याने मंजुर झालेली घरकुल सातत्याने रद्द झाली. या रहिवाशांना घराची उपलब्धता नसल्यामुळे नैसर्गिक आपत्तीतही मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता.
यामधून प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेतून एका घरासाठी १ लाख २० हजार रुपये तसेच शौचालयासाठी प्रतिकुटूंब १२ हजार रुपयांचे अनुदान मंजुर झाले. त्यातच या प्रकल्पात प्राधान्यांने गवंडी प्रशिक्षण योजनाही राबविण्यात आल्याने याच रहिवाश्यांना रोजगाराची संधी मिळाली. या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून व पंडित दिन दयाळ योजने अंतर्गत रस्त्यांकरीता ४५ लाख व भूमिगत गटारी आणि पाईपलाईनकरीता ५ लाख रुपये असा एकुण ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने हा गृहप्रकल्प सर्व सुविधांनी परिपूर्ण झाला आहे.