अहमदनगर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवान गडावरील दसरा मेळावा व सीमोल्लंघन सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला आहे. कोरोनावर लस निघेपर्यंत गडाचे महाद्वार खुले होणार नसल्याची माहिती गडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी दिली आहे. भगवान गडाची स्थापना होऊन एकूण 69 वर्षे झाली. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गडाचं नाव भगवानगड ठेवले होते. त्यावेळपासून आजपर्यंत दसरा मेळावा आणि भाविकांची परंपरा खंडित झालेली नव्हती.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक विशेष करून वंजारी समाज बांधव आवर्जून मोठ्या संख्येने दसरा मेळाव्याला येत असतात. समाधी दर्शन, पूजा, गुरु मंत्र, दीक्षा, शस्त्रपूजन व दर्शन सोहळा असे विधी या ठिकाणी या निमित्ताने होत असतात. तसंच महाप्रसादाचे वाटप केले जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शन, मेळावा यासह सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
याबाबत महंत शास्त्री यांनी सांगितलं की गडावर अनेक विद्यार्थी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत आहेत, लॉकडाऊन झाल्यापासून एकही विद्यार्थी प्रवेशद्वाराबाहेर गेला नाही. गडावरील एकाही व्यक्तीला बाबांच्या कृपेने रोगाची बाधा झाली नाही. गडावर दैनिक धार्मिक विधी सुरू असून भाविक महाद्वाराचे दर्शन बाहेरूनच घेऊन माघारी फिरतात. सध्या कुणालाही प्रवेश दिला जात नाही. गर्दीचा अंदाज पाहता दसरामेळवा भाविकांना त्रासदायक होऊ नये यासाठी रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.
मुंडे कुटुंबामुळे भगवानगड नेहमी प्रसिद्धीच्या झोतात-
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत अनेक वर्ष झालेल्या दसरा मेळावा आणि त्यांच्या भाषणाने भगवानगड नेहमीच चर्चेत राहिला. या गडावरूनच एका भाषणात मुंडे यांनी मला गडावरून दिल्ली दिसते, असे सूचक वक्तव्य केलं होते. अनेक राजकीय नेते या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने कार्यक्रमांना उपस्थित राहात होते. मात्र मुंडे यांच्या दुर्दैवी निधनानंतर गेल्या काही वर्षांत गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात वितुष्ट आले आहे. त्यामुळे शास्त्रींनी गडावर कोणताही राजकीय कार्यक्रम यापुढे होणार नाही, असं घोषित केले. यंदा तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनही रद्द करण्यात आले आहे.