अहमदनगर - कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आज(गुरुवार) 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेल्याचे चित्र पहायला मिळाले. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोहचलेल्या डॉक्टरांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातील डॉ. सचिन जोशी यांनी दिली.
नोंदणी न केलेल्या नागरिकांमुळे गर्दी -
बुधवारी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध झाली. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच सकाळी 8 वाजता टोकन घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, अचानक ऑनलाईन नोंदणी न केलेल्या नागरिकांनी देखील टोकनसाठी नंबर लावल्याने नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहाटे 4 वाजल्यापासून नागरिकांनी नंबर लावण्यास सुरुवात केली होती. डॉक्टरांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की झाली. शेवटी पोलिसांना बोलावण्यात आले. आता पोलीस बंदोबस्तात नागरिकांना लसीकरण केले जात आहे.
सर्वांचे लसीकरण होईल मात्र, गैरवर्तणूक झाल्यास लसीकरण करणार नाही -
कोपरगावमध्ये पुरेशी लस उपलब्ध झाली आहे. यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रवार एकाचवेळी गर्दी करू नये. सर्व नागरिकांना लस मिळणार असून दर दिवसाला तीनशे नागरिकांना लस दिली जाईल, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयातील डॉ. सचिन जोशी यांनी दिली. मात्र, नागरिक डॉक्टरांसोबत गैरवर्तन करतात. त्यामुळे जोपर्यंत डॉक्टरांना सुरक्षा मिळणार नाही तोपर्यंत लसीकरण करणार नाही, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.