अहमदनगर - सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन केले असल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अकोले तालुक्यातील समशेरपूर परिसरात काल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अकोले तालुक्यातील समशेरपूर या परिसरात काल मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाल्याने ठिकठिकाणी गारांचे ढीग दिसत होते. शेतातून पाणीही वाहत होते तर आढळा परिसरात वाढत्या उन्हाच्या कडाक्याने वातावरणात उष्णता निर्माण झाली. समशेरपूर परिसरात उकाडा जाणवत होता. वातावरणात अचानक बदल झाल्याने परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.
गारांचा जोरदार मारा होता. अनेक ठिकाणी गारांचे ढीग जमले दिसून आले. शेतातून काढण्यासाठी आलेला गहू, कांदा, डाळिंब, आंबा व इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.