अहमदनगर- यम..हा यम है हम, कोरोना यम..!! घराबाहेर पडू नका अन्यथा मी घेऊन जाईन तुम्हाला, असा दम भरत नागरिकांना घरात रहा सुरक्षित रहा, असे आवाहन स्वतः यमराज कर्जत शहरात करत आहेत. अरे बाबांनो घरातच थांबा आणि कोरोनावर विजय मिळवा असे वारंवार सांगूनही कर्जतकर ऐकत नसल्याचे पाहून नगर जिल्ह्यातील कर्जत नगर पंचायतीच्यावतीने आज थेट यमराजालाच पाचारण करण्यात आले. बरं यमराज आले ते ही आपले प्रिय वाहन अर्थात रेड्यावर बसून आणि मग काय या यमराजांनी नागरिकांना घरात बसा नाही तर माझ्याबरोबर निघा असा दमच भरला.
कर्जत शहरात नगर पंचायत कोरोनाशी लढताना विविध उपाययोजना करत असताना अनेक उपक्रम राबवून जनजागृती व प्रबोधन करत आहे. आज अचानक कर्जत शहराच्या रस्त्यावर थेट यमराजच फिरताना दिसत असून रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना घरातच बसण्याचा सल्ला दिला. कर्जत नगर पंचायतीने अनोखा उपक्रम राबवत कर्जत शहरात यामराजानाच फिरविले.
नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा प्रतिभा भैलूमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सुरुवातीला या यमराजाची पूजा करत आमच्या कर्जत शहरातील कोणालाही नेऊ नका, अशी विनवणी केली. त्यास स्वतः यमराज यांनी तथास्तू म्हटले मात्र नियम न पाळणाऱ्या कोणालाही आपण सोडणार नाही, असे म्हणत कोरोनाच्या या दुष्ट चक्रात प्रत्येकाने घरीच राहावे असे आवाहन केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा आहे.