अहमदनगर- जिल्ह्यातील जामखेड येथील आरोळे हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षातील रूग्णांच्या चेहर्यावरील कंटाळा घालविण्यासाठी येथील समन्वयक सुलताना शेख यांनी रूग्णांना झिंगाट गाण्यावर डान्स करण्यास लावले आणि काय आश्चर्य एका ऐंशी वर्षाचे आजी आजोबांनी डान्स केला. आजोबा वय आणि आपण कोरोना बाधित आहोत हे विसरून झोकात नाचले. त्यांचा डान्स पाहून इतर अनेक रुग्णांना देखील मोह आवरला नाही आणि त्यांनी देखील डान्समध्ये सहभाग घेतला. एकूणच यामुळे कोरोनाबद्दल यांच्या मनात असलेली भितीच निघून गेली असेच म्हणावे लागेल.
सामाजिक दातृत्वाच्या भूमिकेतून काम-
आज आपण कोरोना रुग्णांची परिस्थिती अतिशय गंभीर झाल्याच्या बातम्या ऐकतो आहे. अनेक रूग्ण भितीने तर काही रेमडेसीवीर इंजेक्शन न मिळाल्याने गेले आहेत. अशा परिस्थितीत जामखेड येथील आरोळे हॉस्पिटल खऱ्या अर्थाने रूग्णांना जीवनदान देत आहे. कोरोना महामारीमुळे श्रीमंतापासून ते सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक जण भितीच्या सावटाखाली आहे. या कठीण काळात अनेक हॉस्पिटलनी रुग्णांना लुटलंय. पण जामखेड येथील सेवावृत्तीसाठी प्रसिद्ध असलेले आरोळे हॉस्पिटल याला अपवाद आहे. त्यामुळेच अनेक दानशूर या हॉस्पिटलच्या मदतीला पुढे आलेले आहे.
आनंदी मन आजारावर करते मात-
कोरोना झाल्यानंतर रूग्णाची मानसिकता काय आहे, हे ओळखणं महत्वाचं असतं. रूग्णांच्या चेहर्यावरील कंटाळा, भिती गेली पाहिजे. यासाठी हास्पिटलमधील कर्मचारी देखील काळजी घेत आहेत. एक प्रकारे रूग्णांचे मनोरंजन झाले तर निश्चितच रुग्ण एका वेगळ्या विश्वात जातील याच भावनेतून आरोळे हॉस्पिटल मधील समन्वयक सुलताना शेख यांनी सर्व रूग्णांना झिंगाट गाण्यावर डान्स करण्यास लावले आणि काय आश्चर्य ऐशी वर्षाचे आजी आजोबांनी देखील डान्स केला.