अहमदनगर - यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मास्टर माइंड बाळ बोठे हा घटनेनंतर तीन महिन्यांपासून फरार असल्याने पोलीस प्रशासनाला सापडू शकला नाही. याबाबत पोलिसांनी पारनेर न्यायालयात बाळ बोठेला फरार घोषित करावे, अशी मागणी केली होती. त्यावर गुरुवारी पारनेर न्यायालयाचे कनिष्ठस्तर प्रथम वर्ग न्यायाधीश ऊमा बोऱ्हाडे यांनी त्याला फरार घोषित केले आहे. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी बोठे नगरमध्ये राहत असलेल्या घरावर फरार असल्याची आणि त्याने नऊ मार्चपर्यंत पारनेर कोर्टात हजर राहण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची नोटीस चिटकावली आहे.
पोलीस करणार बोठे फरार असल्याबद्दलची माहिती प्रसारित-
बुधवारी न्यायालयात याबाबत सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने बोठेला फरार घोषित केले. पोलीस आता बोठेच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याची मागणी करण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने आता बोठे फरार आरोपी असल्याबद्दल पोलीस विविध माध्यमातून प्रचार करणार आहेत.
बोठेच्या कुटुंबाने केला माध्यमांना वृत्तांकन करण्यास मज्जाव-
गुरुवारी रात्री उशिरा तोफखाना पोलिसांचे पथक बोठेचा सावेडी उपनगरात तीन मजली आलिशान बंगला असलेल्या असलेल्या ठिकाणी गेले. याची खबर लागताच वार्तांकन करण्यासाठी माध्यम प्रतिनिधी त्याठिकाणी गेले असता, बोठेच्या पत्नीने फोटो, शूटिंग घेण्यास विरोध केला. यावेळी माध्यमप्रतिनिधींचे मोबाईलमध्ये फोटोसुद्धा घेतले गेले. पोलिसांनी मात्र बंगल्याच्या आतील भिंतीवर न्यायालयाची नोटीस डकवली आहे.तसेच या सर्व कारवाईचे व्हिडीओ शूटिंगही केले आहे. मात्र एकूण केलेल्या कारवाईची माहिती माध्यमांना पोलिसांनी दिली नाही.
तीन महिन्यांपासून मास्टरमाइंड बाळ बोठे फरार-
रेखा जरे हत्याकांडात वरिष्ठ पत्रकार असलेला बाळ बोठे हा मुख्य आरोपी म्हणून पुढे आला असून मात्र तो फरार आहे. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलेली असून नुकतेच त्यांच्या विरोधात पारनेर न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले आहे. मात्र बोठे सापडला नसल्याने त्याचा जबाब घेतल्यानंतर आणि तपास केल्यानंतर पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात येईल. बोठेला फरार घोषित करावा, या मागणीचा अर्ज तपासी अधिकारी आणि नगर ग्रामीण विभागाचे पोलिस उपाधीक्षक अजित पाटील यांनी चार दिवसांपूर्वी पारनेर न्यायालयात सादर केला होता. या अर्जावर गुरुवारी सुनावणी पूर्ण होऊन न्यायाधीश उमा बोऱ्हाडे यांनी बोठेला फरार घोषित केले.
फरार बाळ बोठेच्या अडचणी वाढल्या-
बोठेला आता फरार घोषित केले असल्याने त्याच्या अडचणीत वाढ झालेली आहे. पोलिसांनाही आता बोठेच्या मुसक्या आवळण्यासाठी त्याची मालमत्ता जप्त करून त्याची कोंडी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बोठेला फरार घोषित करण्यात आल्याने तपासी अधिकारी अजित पाटील बोठेच्या मालमत्तेची त्याचबरोबर बँक खात्याची माहिती संकलित करून न्यायालयात सादर करता येईल. तसेच सदर मालमत्ता जप्त करण्याची तसेच बँक खाती सील करण्यासंदर्भात आदेश देण्याची मागणी करतील.
30 नोव्हेंबरला झाला होती रेखा जरे यांची निर्घृण हत्या-
रेखा जरे या 30 नोव्हेंबर 2020 ला कुटुंबासोबत पुण्याहून नगरकडे आपल्या कार मधून परतत असताना वाटेत जातेगाव घाटात त्यांच्या कारला मोटारसायकल वरून आलेल्या दोन युवकांनी अडवले आणि तुमच्या कारच्या आरशाचा कट लागला, असल्याचा कांगावा करत सुरुवातीला हुज्जत घातली. त्याच दरम्यान आरोपींनी रेखा जरे यांच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला, यात रेखा जरे यांचा अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. भांडणाच्या दरम्यान जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने एका आरोपीचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढला होता. हाच फोटो पोलिसांना आरोपींपर्यंत घेऊन गेला आणि सुरुवातीला दोन हल्लेखोर, तर या कटात सहभागी असलेले इतर तीन आरोपी अशा पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. या पाच आरोपींची चौकशी दरम्यान रेखा जरे हत्याकांडाचा मुख्यसूत्रधार मास्टरमाइंड वरिष्ठ पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे असल्याचे उघड झाले. मात्र पोलीस त्याच्यापर्यंत पोहचेपर्यंत तो फरार झाला होता. तेंव्हापासून तो अद्याप फरार असून आता न्यायालयाने बाळ बोठेला अधिकृतपणे फरार घोषित केले आहे.