अहमदनगर - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा आषाढी पायी वारी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसेच शासनाने दिंड्यांची परवानगी नाकारली आहे. यामुळे सरला बेट येथील श्री संत योगिराज गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याची 175 वर्षांची परंपरा खंडीत झाली असून या कारणाने भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव असल्याने यंदा पायी वारी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या या विमान, हेलिकॉप्टर किंवा बसेसद्वारे 30 जून रोजी पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानपेक्षा हेलिकॉप्टरने पालख्या नेणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सुचविले आहे. बसेसने पालख्या नेल्यास भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरने पालख्या नेण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना माहिती देण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यंदाच्या वारीसाठी, १७५ वर्षांपासून सुरू असलेली श्री संत सोगिराज गंगागिरी महाराज यांच्या दिंडीला परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे ही परंपरा खंडीत झाली आहे. त्यामुळे सरला बेट येथे नित्यनियम म्हणून मंदिरास प्रदक्षिणा करून दिंडी प्रस्थान सोहळा करण्यात आला. शासन दारू विकण्यासाठी परवानगी देत आहे, पण वारकऱ्यांना भजन करायला वेळ देत नाही, अशी खंत सरला बेटचे मठाधिपती हभप रामगिरी महाराज यांनी व्यक्त केली. शासनाने दिंडीबाबत विचार करायला हवा होता, असेही महाराज म्हणाले.
दरम्यान, राज्य शासनाच्या सुचनेनुसार एक दिवस अगोदर पालख्या आळंदी ते पंढरपूर येथे पोहोचविण्यात येणार आहे. तत्पूर्वी परंपरेनुसार श्री संत तुकाराम महाराज यांची 12 जून रोजी तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची 13 जून रोजी 50 व्यक्तींच्या उपस्थितीत अनुक्रमे देहू आणि आळंदी येथील मंदिर परिसरात पालखी फिरवून पालख्यांनी प्रस्थान ठेवले आहे. 30 जून रोजी पालख्या पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.
हेही वाचा - कोपरगाव तालुक्यात मुसळधार पाऊस; ओगदी बंधारा भरला
हेही वाचा - जामीन होत नसल्याने आरोपीचा कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न, चमच्याने फाडले स्वत:चे पोट