राहाता ( अहमदनगर) केंद्र, राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राहाता ग्रामीण रुग्णालय येथे आज कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली. ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील जवळपास शंभर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आज लसीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणानंतर संबंधित व्यक्तीला अर्धातास निगराणीत ठेवण्यात येत आहे.
लसीकरण मोहिमेची सर्व तयारी आरोग्य प्रशासनाने पूर्ण केली असल्याची व त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोकूळ घोगरे यांनी यावेळी दिली. लसीकरण करणाऱ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. काही लाभार्थ्यांना त्यांच्याहस्ते यावेळी लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहिमेतील या पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे लसीकरणादरम्यान पालन करण्यात येत आहे. लसीकरण झाल्यावरही मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात 12 केंद्रांवर लसीकरण
त्यापूर्वी पुणे येथून कोरोना लसीचे डोस योग्य त्या प्रोटोकॉलनुसार अहमदनगर येथे आणण्यात आले. तेथून जिल्हा परिषद येथे त्याची साठवणूक करण्यात येऊन, त्यानंतर या लसीचे वितरण संबंधित लसीकरण केंद्रांना करण्यात आले. जिल्ह्यात एकूण 12 केंद्रांवर पहिल्या टप्प्यात ही मोहीम राबवण्यात येत आहे, यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि महानगरपालिका क्षेत्रातील चार नागरी आरोग्य केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. या लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून दिनांक आठ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात कोरोना लसीकरणासाठी सरावफेरी घेण्यात आली होती.